बीज सोहळ्यानिमित्त भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज..

बीज सोहळ्यानिमित्त भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज..

देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 375वा सदेह वैकुंठगमन अमृतमहोत्सव सोहळा बुधवारी (दि. 27) देहूनगरीत संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त येणार्‍या लाखो वारकरी, भाविकभक्तांच्या स्वागतासाठी स्थानिक नगरपंचायत, संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

जेथे वैष्णवांचा वास ।
धन्य भूमी पुण्य देश ॥1॥

या संत तुकोबारायांच्या अभंग उक्तीप्रमाणे आज संत तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूनगरीत गरुड टक्यांच्या, टाळ मृदंगाच्या आणि हरिनामाच्या जयजयकारात हा अवघा वैकुंठगमन सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. यंदा मुख्य मंदिर ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान असलेल्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे वारकरी, या सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे. यंदाचा बीज सोहळा सीसीटीव्ही कॅमेर्र्‍याच्या निगरानीखाली होणार असून, प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष असणार आहे. अनेक ठिकाणी टॉवर उभे करण्यात आले आहेत.

बीज सोहळ्यातील कार्यक्रम

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजसोहळ्यानिमित्त देहू देवस्थानचे अध्यक्ष व वंशज यांच्या वतीने हे कार्यक्रम होणार आहेत. पहाटे 3 वाजता काकडआरती, पहाटे 4 वाजता 'श्रीं'ची महापूजा आणि श्री संत तुकाराम महाराज व शिळा मंदिरात तसेच पहाटे 6 वाजता वैकुंठस्थान मंदिर येथे तुकाराम महाराजांची महापूजा होणार आहे. सकाळी 10:30 वाजता श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य मंदिरातून वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान होणार असून, दुपारी साडेअकरा ते पावणेबारा वाजता पालखी वैकुंठस्थान मंदिर येथे पोहोचेल. त्याच ठिकणी सकाळी 10 ते 12 दरम्यान श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त हभप देहूकरमहाराज यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर वैकुंठस्थान मंदिरात महाआरती होऊन पालखी पुन्हा वैकुंठस्थान मंदिरापासून मुख्य मंदिराकडे निघेल आणि एक वाजता पालखी मुख्य मंदिरातील भजनी मंडपात विसावली जाईल. त्यानंतर रात्री व सकाळी मुख्य मंदिर, जन्मस्थान मंदिर आणि वैकुंठस्थान मंदिर परिसरात फड आणि दिंड्यांचे कीर्तन होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news