पुणे : पालिकेचा महावितरणला दणका; परस्पर रस्ते खोदाई भोवली | पुढारी

पुणे : पालिकेचा महावितरणला दणका; परस्पर रस्ते खोदाई भोवली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पथ विभागाला कसलीही कल्पना न देता दोन दिवसांपूर्वी केलेला नवीन डांबरी रस्ता खोदल्याप्रकरणी महापालिकेने महावितरणला दणका दिला आहे. नवीन रस्ता खोदला म्हणून महावितरणला पंधरा लाखांचा दंड करण्यात येणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते पेरूगेट या रस्त्यावर 11 मार्च रोजी महापालिकेच्या पथ विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरणानंतर रस्ता चकाचक झाला. या रस्त्यावर डांबरीकरण केल्यानंतर चेंबर खड्ड्यात गेले आहेत, हे चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणण्याचे काम बाकी असताना आणि संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसताना पथविभागाने महावितरण कंपनीला या रस्त्यावर 15 मार्चपासून खोदाई करण्यास परवानगी दिली.

या परवानगीनुसार महावितरणने शुक्रवारपासून खोदकामास सुरुवात केली व काही अंतर नवीन रस्त्यावर खोदकाम करून केबल टाकण्यात आली. यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. बर्‍याचवेळा पथ विभागाने रस्ता केल्यानंतर तो पाणीपुरवठा किंवा ड्रेनेज विभागाकडून खोदण्यात येतो. दोन विभागामध्ये समन्वयाचा अभाव असतो, त्यामुळे असे प्रकार घडत असतात. मात्र, पथ विभागाने दोन दिवसापूर्वी केलेल्या रस्त्यावर पथ विभागच पुन्हा खोदाईस परवानगी देतो, त्यामुळे पथ विभागातील अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, खोदाईची परवानगी देताना खोदाई करण्यापूर्वी पथ विभागाला कल्पना देणे व खोदाईचा आराखडा सादर करण्याचे बंधन घालण्यात आले होते, तसे महावितरणने मान्यही केले आहे. असे असताना महावितरणने खोदाई करण्यापूर्वी पथ विभागाला कल्पना दिली नाही. नवीन डांबरीकरण केलेला रस्ता खोदला. त्यामुळे पथ विभागाने महावितरणला नोटीस बजावून पंधरा लाखांचा दंड करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button