

देहूगाव (पुणे) : पिंपरी चिंचवड हद्दीतील किवळे येथे होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला होता. तर, 3 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची दखल देहू नगरपंचयतीने घेतली असून अनधिकृत होर्डिंगची माहिती घेवून संबंधित होर्डिंगमालकांना नोटीस पाठविण्याचे काम सुरू केले आहे. देहू नगरपंचायत हद्दीत लहान-मोठे असे 21 हून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. त्यामुळे देहूनगर पंचायत अनधिकृत होर्डिंगच्या विळख्यात सापडले असल्याचे बोलले जात आहे.
देहुनगर पंचायत हद्दीत विनापरवाना होर्डिंग उभे करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित होर्डिंगला स्ट्रक्चर परवानगी असल्यास परवानगीची सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्यास संबंधित होर्डिंगमालकांना नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. होर्डिंगकरिता देहू नगरपंचायतीची रितसर परवानगी घेण्याकरिता स्ट्रक्चर अभियंता यांचे स्थैर्य तपासणी, मालकी हक्काची कागदपत्रे होर्डिंग नकाशे आणि त्या अनुषंगिक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील 21 हून अधिक अनधिकृत होर्डिंगपैकी किमान दहा होर्डिंग धोकादायक व अतिशय वर्दळ असलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या होर्डिंगपैकी एकाही होर्डिंगची देहूनगर पंचायत दप्तरी नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या होर्डिग मालकांकड़े देहू नगरपंचायतीची परवानगी नाही. शिवाय आकाशचिन्ह व परवाना विभागाची कसलीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे असे देहूनगर पंचायतीकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित होर्डिंग मालकांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. होर्डिंगमुळे काही अपघात घडल्यास अथवा जीवितहानि झाल्यास त्यास होर्डिंगमालक जबाबदार राहणार आहेत.
– डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, देहू नगरपंचायत