चाकण : जंगलाची शांतता बिघडली; वन्यप्राणी लोकवस्तीत

चाकण : जंगलाची शांतता बिघडली; वन्यप्राणी लोकवस्तीत
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकणसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात बिबट्या शिरल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जंगलांना खेटून शहरे वसली आणि जंगलांमध्ये निरनिराळे प्रकल्प आणण्यात आले. शहर आणि गावांनजीक मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले वन्यप्राणी खाद्य आणि आसर्‍यासाठी मनुष्यवस्तीत शिरू लागले आहेत.

लपण्यासाठी उसाची शेती, पाण्यासाठी आणि शिकारीसाठी पाळीव प्राणी असल्याने बिबट्याने मानवी वस्तीकडे धाव घेतल्यानंतर आता त्याचा यापुढे कसा बंदोबस्त करता येईल याची नुसतीच चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. वन विभागाला वन्यजीव महत्त्वाचा आहे. मात्र, त्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि नागरिकांमध्ये असलेली प्रचंड दहशत याचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी नागरिकांची भावना आहे.

खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्या आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याबाबत चांगलीच दहशत आहे. शेतावरच्या मानवी वस्त्यांमधून रात्री नागरिक बाहेर येण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खेड तालुक्याच्या विविध गावांमध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला झालेल्या गणनेत जंगलात बिबट्या आढळून आलेला नाही. त्यामुळे लोकवस्तीत ठिकठिकाणी दिसणार्‍या बिबट्याचे भीमाशंकर अभयारण्य या नैसर्गिक अधिवासात मात्र वास्तव्य संपल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पश्चिम घाटावरील अतिशय संपन्न अशी जैववैविध्यता लाभलेले ठिकाण म्हणून भीमाशंकर अभयारण्याची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांत अभयारण्य व परिसरात अनेक चुकीची कामे करण्यात आली. ज्यामुळे अभयारण्याचे नुकसान होऊन वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागात पवनऊर्जा प्रकल्पांसाठी यंत्रांच्या साहाय्याने 40 ते 60 फूट इतक्या रुंदीचे रस्ते व अन्य कारणांनी या संवेदनशील भागातील जंगलाची शांतता बिघडली. त्यामुळे वन्यप्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतल्याचा आरोप होत आहे.

उसाच्या शेतात बिबट्यांचा तळ
जंगलांवर मानवाने अतिक्रमण केल्यानंतर उसाच्या वाढत्या शेतीमुळे सुरक्षित अधिवास म्हणून बिबट्यांनी उसाची लागवड होत असलेल्या भागात तळ ठोकला आहे. जंगल सधन न राहिल्याने उसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय बिबट्यांना पर्याय राहिला नसल्याची बाब समोर येत आहे. उसाच्या वाढत्या फडांमुळे लपण्यास जागा, पाणी व पाळीव प्राण्यांच्या उपलब्धतेमुळे भक्ष्याची सोय होत असल्याने आपल्या शिकारीच्या शोधात बिबट्याही उसाच्या फडाचा आश्रय घेऊ लागला आहे. त्यामुळे त्याचे दर्शन लोकवस्ती आणि शहरांमध्ये वारंवार होऊ लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news