

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत 'विद्यापीठ विकास मंच'च्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला, तर सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत 8 जागांचा निकाल जाहीर करण्यात आला, तर दोन जागांची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे त्यांचा निकाल जाहीर झाला नाही.
विद्यापीठ विकास मंचातर्फे अनुसूचित जमाती प्रवर्गातील गणपत पोपट नांगरे यांनी 13 हजार 995 मते, भटक्या जमाती प्रवर्गातून डॉ. विजय निवृत्ती सोनावणे 14 हजार 101 मते, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे 13 हजार 512 मते मिळवून विजयी झाले. तर, इतर मागास वर्गातून (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोरडे-पाटील यांनी 13 हजार 300 मते, तर खुल्या प्रवर्गातून प्रसेनजित फडणवीस 4 हजार 447 मते, सागर वैद्य 3 हजार 711 मते, विजय नरवडे 3 हजार 665 मते महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर यांनी 15 हजार 649 मते मिळवून विजय मिळवला. या उमेदवारांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले. खुल्या गटातील पाच जागांपैकी उर्वरित दोन जागांसाठी रात्री मतमोजणी सुरू होती.
विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करीत होते. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. 500 सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचा विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ. वैशाली साकोरे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उघडपणे या निवडणुकीत पॅनेल करून उमेदवार उतरवल्याने या निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. त्यात भाजपशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा आदी पक्ष-संघटनांचे 37 उमेदवार 10 जागांसाठी रिंगणात होते. परंतु, विद्यापीठ विकास मंचाने बाजी मारली आहे.
विद्यापीठात मतमोजणीनंतर पदयात्रा, विजयी मिरवणूक, डी.जे. लावून सभा, कार्यक्रम घेऊ नयेत, अशा नोटीस आम्हाला चतु:श्रृंगी पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या होत्या. परंतु, विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या शेजारीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तसेच विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर भगवे झेंडे घेऊन जल्लोष केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न स्टुडंट हेल्पिंग हॅण्डच्या कुलदीप आंबेकर यांनी विचारला आहे.