

पिंपरी : देशाला रसातळाला पोहोचवण्याचे काम भाजपने केले आहे. पेट्रोलचे भाव शंभराच्या पुढे गेले आहेत. गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पार गेले आहेत. जनतेला वार्यावर सोडणार्या व भ्रष्टाचारातून जमा केलेल्या खोक्यांच्या माध्यमातून लोकशाहीच धोक्यात आणणार्या भाजपला पराभवाचा धक्का चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नक्कीच बसणार आहे, असा विश्वास आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ रहाटणी, वाकड व थेरगाव परिसरातील पदयात्रेदरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पाटील म्हणाले, की नागरिक व श्रमिकांची पिळवणूक सुरू आहे. त्याविरूद्ध दाद मागितली तर ताटात येणारी भाकरही जाण्याची भीती वाटत आहे. यामागे सरकारचा संवेदना नसलेला कारभार कारणीभूत आहे. असंतोष व्यक्त करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य मतदारांना मिळाली आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये भाजप सरकारच्या व सत्ताधार्यांच्या लालचीपणाविषयी प्रचंड संताप आहे. हा रोष मतपेटीतून नक्की बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी माजी नगरसेवक मयूर कलाटे, रेखा दर्शीले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.