पुणे : मेडिकल कॉलेजमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर?

पुणे : मेडिकल कॉलेजमधील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर?

पुणे : आर्थिक भ्रष्टाचाराचे लोण आता महापालिकेने स्थापन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचले आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागेवर प्रवेश देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोरी प्रकरणात बंगिनवार यांचा बोलविता धनी कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनेकदा नीटचा निकाल लागण्याआधीच सेटिंग केले जाते. स्टेट सेलची ऑनलाइन लिस्ट प्रसद्ध केली जात असली तरी प्रत्यक्ष प्रवेश देताना पैसे मागितले जातात. कोट्यधीशांची सीटसाठी वाटेल तेवढे पैसे मोजण्याची तयारी असते. एका विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केल्याने लाचखोरीचे प्रकरण उजेडात आले आहे. यापूर्वी अशा पद्धतीने आणखी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले गेले आहेत का, याबाबतची चौकशी होणार आहे.

पुणे महापालिकेचे अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून चालवले जाते. बंगिनवार यांनी मागणी केलेल्या पैशांच्या वाहत्या गंगेत आणखी कोणाकोणाचे हात धुतले जाणार होते, याबाबतची माहिती पुढे येऊ शकते. महाविद्यालयात एका वर्षात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. त्यापैकी 85 जागा मेरिट लिस्टनुसार भरल्या जातात, तर 15 जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जातात. यासाठी मूळ प्रवेश शुल्कापेक्षा तिप्पट रक्कम आकारली जाते. सध्या मेरिट लिस्टमधील जागेचे शुल्क साडेसात ते आठ लाख रुपये आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी 22 ते 23 लाख रुपये आकारले जातात.

ठरलेली, वसुलीची रक्कम वेगवेगळी

वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी निश्चित शुल्काहून जादाची रक्कम मागितली जात होती. मात्र, या रकमेसाठी कोणतेही बंधन नव्हते. त्यामुळे व्यवस्थापन कोट्यातील 10 जागा असतील, तर त्यासाठी किमान 20 जण पैसे भरण्यास तयार असायचे. जागा भरताना नीट परीक्षेतील मार्कांनुसार प्रवेश दिला जाईल, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री ठरावीक रक्कम घेतली जात असली तरी वरील रक्कम वसूल करण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत.

चौकशीतूनच समोर येणार माहिती

बंगिनवार यांना कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. केवळ बंगिनवार एकटाच सामील आहे की, त्याच्यावर आणखी कोणाचा वरदहस्त आहे, पाळेमुळे कुठवर गेलेली आहेत, याबाबतची माहिती चौकशीतून समोर येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news