

पुणे : महसूल दिनानिमित्त आयोजित सप्ताहमध्ये डीम्ड कन्व्हेयन्स प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वतीने महसूल सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून विविध सेवा देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुद्रांक शुल्काचा परतावा, मानीव अभिहस्तांतर, म्हाडा वसाहतीसंदर्भातील प्रकरणे यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून गृहनिर्माण सोसायट्यांना मालकी हक्काच्या जमिनी करून देण्यासाठी डीम्ड कन्व्हेयन्स मोहीम हाती घेतली आहे. अशा सोसायट्यांसाठीदेखील या सप्ताहमध्ये तीन दिवस विशेष कक्ष स्थापन करून त्यांची प्रकरणे दाखल करून घेण्यात येणार आहेत. 1 मे ते 31 जुलै यादरम्यान नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काची जी प्रकरणे दाखल झाली आहेत. ती सर्व प्रकरणे या सप्ताहमध्ये निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाडेकरार, ई-रजिस्ट्रेशनची प्रलंबित प्रकरणे 8 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.
महसूल सप्ताहात सलोखा योजना, म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून संमतीपत्रावर नोंदणी करून घेणे, दस्तनोंदणी कार्यालयात स्वच्छता मोहीम, दस्तनोंदणी केली मात्र अद्यापही कागदपत्रे घेऊन न जाणार्यांना ती घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. संबंधितांची नावे विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत. दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक यांच्या स्तरावर विविध अडचणी सोडविण्यात येणार आहेत, असे नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.