

वाघोली: वाघोली परिसरात मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणार्या पाससाठी अद्यापही कायमस्वरूपी पास सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर वाघोलीत मयत पास देण्यासाठी चोवीस तास कायमस्वरूपी महापालिका कर्मचार्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाघोलीसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या उपनगरामध्ये अंत्यविधीची प्रक्रिया सुलभ व सन्मानजनक व्हावी, यासाठी येथे स्थायिक मयतपास वितरण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्याची कायमस्वरूपी नियुक्ती होणे गरजेचे आहे. (Latest Pune News)
वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर अनेक महिने मयतपास मिळवण्यासाठी खराडी, येरवडा येथे मयताच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत होती. मनपा वाघोली संपर्क कार्यालयात मयतपास मिळावेत यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी केली होती.
त्यानंतर आरोग्य विभागाने वाघोली येथे एका कर्मचार्याची नियुक्ती केली. परंतु 24 तास पास सुविधा उपलब्ध नसल्याने मयत व्यक्तींच्या नातेवाईकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे. पावसाळा, रस्त्यांची दुर्दशा आणि वाहतूक कोंडी रात्रीच्यावेळी आप्तस्वकीयाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या कुंटुंबीयांना मयतपाससाठी धावपळ करावी लागत आहे.
एखाद्या व्यक्तीचा अपघाती, आजाराने किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेचा मयतपास असणे बंधनकारक आहे. मयतपास स्मशानभूमीत दिल्यानंतरच पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातात. मनपा प्रशासनाने तातडीने मनपा वाघोली संपर्क कार्यालयात मयतपास वितरणासाठी चोवीस तास कायमस्वरूपी कर्मचार्याची नियुक्ती करावी. तसेच पास देणार्यांचे नाव व नंबर असल्याचे फलक लावावे.
- अनिल सातव पाटील, रहिवासी, वाघोली
वाघोलीत सायंकाळी पाच ते सकाळी वाजेपर्यंत मयतपास देण्यासाठी मनपाकडून एक कर्मचारी कार्यरत आहे. तर सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत वाघोलीतील नजीकच्या शासकीय आरोग्यकेंद्रातून पास दिली जाते. पास मिळत नसल्यास नागरिकांनी तक्रार करावी. संबधित कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल. चोवीस तास पास देण्याची सोय करण्यात आली आहे.
- डॉ. रेखा लबडे-गलांडे, विभागीय वैद्यकीय अधिकारी, महापालिका