नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव व वारूळवाडी या गावांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन मीना नदीवरील पुलावरून खाली अज्ञातांनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या टाकल्या असल्याचा प्रकार मंगळवारी( दि. ९) सकाळी उघडकीस आला. या मृत कोंबड्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.
नारायणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नितीन नाईकडे व माजी सरपंच योगेश पाटे यांना माहीती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी ग्रामपंचायत कचरा गाडी पाठवली. माऊली माने, तुकाराम माने, अजय जाधव, संजय जाधव, सत्यवान शिंदे, धोंडीभाऊ भंडलकर मुकेश घाडगे यांनी मोठे प्रयत्न करून मेलेल्या कोंबड्या उचलून योग्य ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावली. तसेच मृत कोंबड्या टाकलेल्या ठिकाणी जंतुनाशक पावडर टाकून परिसर स्वच्छ केला.
या घटनेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित अज्ञाताचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.