नारायणपूर: ५ डिसेंबरपासून दत्त जयंती सोहळा होणार सुरु

नारायणपूर: ५ डिसेंबरपासून दत्त जयंती सोहळा होणार सुरु
Published on
Updated on

सासवड, पुढारी वृत्तसेवा: श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे ५ ते ७ डिसेंबर यादरम्यान दत्त जयंती सोहळा होत आहे. यानिमित्त यात्रेच्या नियोजनासाठी शुक्रवारी (दि. २५) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यानिमित्त ५ डिसेंबर रोजी अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंडाचा २२ वा वर्धापन दिन साजरा केला जात असून, सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व २०० कोटी शिवदत्त नामयज्ञ साजरा केला जात असून, या ठिकाणी होमहवन होईल. ६ डिसेंबर रोजी दत्त मंदिरात दत्तजन्म सोहळा सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी होणार आहे. त्यापूर्वी दुपारी विविध गावांतून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत केले जाईल, तसेच दत्त जन्म प्रसंगी नारायण महाराज यांचे व्याख्यान, आरती, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, सुंठवडा वाटप व देव भेटवणे असे कार्यक्रम होणार आहेत. ७ डिसेंबरला दत्त जयंतीचा समारोप दिवस आहे.

या दिवशी सकाळी मंदिरात आरती होऊन पालखी ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होईल. या वेळी विविध पथके, हत्ती, घोडे, उंट, ढोल-लेझीमच्या गजरात पालखी चंद्रभागा स्नानासाठी प्रस्थान ठेवेल. चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात येऊन या ठिकाणी पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्री १२ वाजता आरतीने सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांनी दिली.

दरम्यान, यात्राकाळात भाविकांना सुविधा पुरविल्या जातील. आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, आपत्ती निवारण कक्ष तसेच सासवड नगरपरिषदेकडून अग्निशमन दलाची गाडी, पाण्याचे टॅंकर, मूव्हिंग टॉयलेट, फॉगिंग मशिनसाठी प्रशासन सहकार्य करील, असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. ही बैठक नारायण महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच यात्रेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. राज्यातून लाखो भाविक दत्त जयंती सोहळ्यासाठी येत असतात. यासाठी सोहळ्यात लागणाऱ्या सर्व बाबींचा आढावा नारायण महाराज यांनी घेतला.

या वेळी पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, नायब तहसीलदार मिलिंद घाडगे, सह गटविकास अधिकारी जे. के. लहामटे, महावितरण विभागाचे उमेश सासणे, नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, आरोग्य अधिकारी पुरंदर डॉ. नितीन काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे यश काटकर, स्वाती दहिवाल, एसटी महामंडळाचे कैलास जगताप, ग्रामसेवक रोहित अभंग, एम. के. गायकवाड, बबन टकले, दादासाहेब भुजबळ, सरपंच चंद्रकांत बोरकर, रामभाऊ बोरकर, प्रदीप बोरकर, रामदास मेमाणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news