पिंपरी : दिव्यांगांच्या दरमहा भत्त्यासाठी तारीख पे तारीख

पिंपरी : दिव्यांगांच्या दरमहा भत्त्यासाठी तारीख पे तारीख

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण निधीतून अनेक योजना राबवल्या जातात. या सर्व योजना आता ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतात. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून दिव्यांगांचा दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता अचानक दर तीन महिन्यांचा एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी कार्यरत अनेक संस्था व संघटनांनी हा भत्ता दरमहा मिळविण्यासाठी नोव्हेंबर 2022 रोजी महापालिकेजवळ लक्षणिक उपोषणही केले होते.

राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तांनी देखील दिव्यांगांना नियमित अर्थसहाय्य देण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेमार्फत दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सर्व संस्था-संघटनांची बैठक घेऊन दिव्यांगांना जानेवारीपासून दरमहा निर्वाह भत्ता देण्याचे मान्य केले होते. मात्र जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिना संपत आला तरीदेखील दिव्यांगांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही.

त्यामुळे महापालिका हद्दीतील दिव्यांगांच्या संस्था-संघटनांनी यासंदर्भात पुन्हा पत्र देऊन बेमुदत आंदोलनाचा गंभिर इशारा देत, 20 मार्च पर्यंत मुदत दिली होती. मात्र अद्यापही निर्णय घेतला गेला नाही. दिव्यांगांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करावा अशी विनंती संस्था-संघटना पदाधिकारी आनंद बनसोडे, हरिदास शिंदे, अशोक सोनवणे, सचिन तुरुकमारे व महिला प्रतिनिधी नविना खंडागळे यांच्या वतीने करण्यात आली आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

महापालिकेमार्फत जानेवारीपासून दिव्यांगांचा निर्वाहभत्ता दरमहा देण्यासंदर्भात निर्णय झाला होता. आता मार्च महिना संपत आला तरीदेखील दिव्यांगांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही.दिव्यांगांच्या संयमचा अंत पाहू नये.मार्चअखेर मागील तीन महिन्याचे एकत्रित अर्थसहाय्य मिळावे तसेच एप्रिलपासून नियमित दरमहा भत्ता द्यावा.अन्यथा नाईलाजाने पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व दिव्यांगांच्या संस्था-संघटना संयुक्तपणे बेमुदत आंदोलन करतील.
                    -हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news