उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड-पुणे डेमू शटलच्या तिसर्या डब्याला सोमवारी (दि. 16) आग लागली. यामुळे दौंड-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी आगीचे नेमके कारण स्पष्ट करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. अशा छोट्या-मोठ्या घटना वारंवार घडत असूनही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दौंड-पुणे मार्गावर सकाळी धावणार्या दोन्ही डेमू गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. दौंडपासूनच प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही, त्यामुळे पाटस, कडेठाण, खुटबाव, केडगाव, यवत, उरळी, लोणी आणि हडपसर येथील प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रेल्वे प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे निमूटपणे दुर्लक्ष करत आहे, असा प्रवाशांचा आरोप आहे.
या गंभीर समस्येवर राजकीय नेते आणि प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला खडसावून जाब विचारण्याची गरज आहे. मात्र ते देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रेल्वे प्रवाशांनी गाड्यांना डबे वाढवण्याची मागणी केली आहे, तसेच सकाळी 8.30 ते दुपारी 3 या वेळेत एकही डेमू नसल्याने होणारा त्रास दूर करण्याचीही मागणी आहे.
दौंड-पुणे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होऊन जवळपास 10 वर्षे उलटली तरी, या मार्गावर विद्युत लोकल अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना इलेक्ट्रिक इंजिन लावून वाहतूक केली जात आहे. याबाबत स्थानिक आमदार आणि खासदारही निष्क्रिय असल्याचे दिसून येते. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे अनेकदा मागणी करूनही केवळ चर्चाच होते, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
निवडणुकांच्या वेळी प्रवाशांना मतांसाठी आमिषे दाखवणारे राजकीय नेते निवडणूक संपताच त्यांच्या समस्यांकडे पाठ फिरवतात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. या राजकीय निष्क्रियतेमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असून त्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेतेच जबाबदार असतील, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात आणि विद्युत लोकल सुरू कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.