बारामती : हंगाम सुरू होताच धोकादायक ऊस वाहतूक; अपघात होण्यापूर्वीच खबरदारी गरजेची

बारामती : हंगाम सुरू होताच धोकादायक ऊस वाहतूक; अपघात होण्यापूर्वीच खबरदारी गरजेची

बारामती; पुढारी वृत्तसेवा: साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने बारामती तालुक्यातील राज्य मार्गांवर अनेक वाहनांतून धोकादायक पद्धतीने उसाची वाहतूक केली जात आहे. मागील काही वर्षांत वारंवार अपघात घडूनही वाहन चालक, मालक यांनी यातून काहीही धडा घेतला नसल्याचे सध्या सुरू असलेल्या वाहतुकीवरून दिसत आहे. अपघाताची दाट शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.

सध्या तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि इतर खासगी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यात येत आहे. बैलगाडी, टूक आणि ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र अनेक वाहन चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. पूर्वी अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने इतर वाहन चालकांची गैरसोय होत आहे. ट्रॅक्टर चालक दोन ते तीन ट्रॉल्या जोडलेली वाहने बर्‍याचदा रस्त्याच्या कडेला उभी करीत आहेत.

त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर लांबच्या लांब रांगा लागतात. विना क्रमांकाची वाहने, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, विमा, रिफ्लेक्टर नसणे, चढ-उतार, वळण आदी ठिकाणी अचानक वळणे अशा पद्धतीने उसाची वाहतूक सुरू आहे. आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात रिफ्लेक्टर आणि सुरक्षित वाहन चालविणे याविषयी मार्गदर्शन केले जाते; मात्र त्याशिवाय तो विभाग फारसे काही करताना दिसत नाही. एखादा अपघात झाल्यानंतरच नियमांचे पालन करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अल्पवयीन मुले ट्रॅक्टर चालक
ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डिंग बसवून विविध हिंदी गाण्यांची धून सध्या गावोगावी ऐकायला मिळत आहे. काही अल्पवयीन मुलेही चालक म्हणून काम करतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकत आणि उसाने भरलेल्या दोन ते तीन ट्रॉल्या ओढण्याची जणू स्पर्धाच रस्त्यावर दिसत आहे. बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस प्रशासनानेही वाहतूक व्यवस्था व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news