

पुणे: ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे अध्यक्ष दामोदर साहू अखेर बरे झाले. त्यांनी मंगळवारी (दि. 10 जून) कार्यकारी मंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. मात्र, ही बैठक रात्री उशिरापर्यंत लांबली. संस्थेचा अर्थसंकल्प तुटीचा झाल्याने त्यावर सर्वांनीच चिंता व्यक्त केली. सर्वच जण अस्वस्थ असल्याने बैठकीत अजेंड्यावर नेमके काम होत नसल्याची खंत काही विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ या संस्थेला 12 जून 2025 रोजी 120 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच काळात अध्यक्ष दामोदर साहू (ओडिशा), तर मिलिंद देशमुख (पुणे) यांनी स्वतःच्या मुलांना आजीवन सदस्य करण्यासाठी बैठकांवर बैठका घेऊन सार्वजनिक संस्थेला कौटुंबिक करण्याची जणू चढाओढ सुरू केली आहे. त्यामुळे संस्थेच्या मूळ उद्देशाला काळिमा फासल्याचा प्रकार जूनच्या वार्षिक सत्राच्या तिसर्या दिवशी 10 जून रोजी झालेल्या बैठकीत दिसला.(Latest Pune News)
राऊतांवरून बैठकीत घमासान
संस्थेचा विकास, सामजिक धोरणे, चळवळ तसेच नशामुक्ती आणि शेतीपूरक धोरणे, यावर काम करणारे राऊत हे संस्थेतील भ्रष्टाचार उघडीस आणत आहेत. त्यामुळे त्यांना संस्थेतून दूर करण्याचे षडयंत्र अध्यक्ष साहू, मिलिंद देशमुख करीत आहेत. या सर्वांचे मास्टर माइंड प्रेमकुमार द्विवेदी हेच असल्याचा आरोप होत आहे. कारण, राऊत यांची कुठलीही परवानगी न घेता विविध शाखांमध्ये बदली केली, कुटुंब फोडले आणि शेवटी मानधन रोखत आर्थिक कोंडी केली. राऊत आजीवन सदस्य असल्याची धर्मादाय न्यायालयात नोंदसुद्धा केली नाही.
संचालक मंडळावर अध्यक्षांचा दबाव कायम
अध्यक्ष साहू यांचा कार्यकारी मंडळावर दबाव कायम असल्याचे दिसत आहे. मात्र, भ्रष्टाचारात बुडालेल्या देशमुखची पाठराखण करण्यातच ते व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संस्थेत पक्षपात घडत असल्याची खंत संस्थेत व्यक्त झाली.
संस्था कुटुंबातच वाटून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेतील भ्रष्टाचार, मालमत्ता विक्री अशा प्रकारचे कारनामे बाहेर काढणार्या प्रवीणकुमार राऊत यांचे मानधन तसेच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदसुद्धा अध्यक्ष यांनी केली नाही. म्हणून संचालक मंडळाने हा विषय अजेंड्यावर ठेवून राऊत यांना न्याय द्यावा, अशी 10 जून 2025 रोजच्या सत्रात मागणी उपाध्यक्षांसह कार्यकारी मंडळाने केली.
वारंवार विनंतीपत्रे; मात्र दखल नाही
याबाबत अध्यक्षांना वारंवार पत्रव्यवहार केले. त्यावर उत्तर कधीच मिळाले नाही. त्यामुळे याची दखल शेवटी उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा व संचालक मंडळाने घेतली. अजेंड्यावर विषय ठेवला. त्यावर देशमुख आणि साहू यांनीच मंगळवारी आकांततांडव करीत गोंधळ घातला आणि सर्वच विषय अर्ध्यावर सोडले.
आंदोलनाने अध्यक्ष झाले बरे
पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने ‘प्रभारी कुलगुरू डॉ. शंकर दास हटाव’ अशी घोषणा देत परिसरात आंदोलन होताना दिसताच आजारी अध्यक्ष साहू अचानक ठणठणीत बरे झाले. सोमवारी दुपारी 3.30 वाजता ऐनवेळी बैठक सुरू केली. आता आजार बरा आहे; मात्र मानसिकता नकारात्मक असल्याने साहू यांनी पुढील सत्र पारदर्शक चालविणे आवश्यक आहे, अशी आशा संचालक मंडळ खासगीत व्यक्त करत आहे.
मंगळवारी झाली ‘धर्मादाय’मध्ये सुनावणी
आपल्या जिवाचे रान करून संस्था अबाधित राहावी, हाच उद्देश आहे, असे मत आजीवन सदस्य राऊत यांनी मांडले. त्याला उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा आणि संचालक मंडळ सदस्य दिनेश मिश्रा, गंगाधर साहू, रमाकांत लेंका यांनी समर्थन दिले. तसेच 120 वर्षे पूर्ण झालेल्या संस्थेला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न आजच्या सत्रात घडला. दि. 10 जून 2025 रोजी संस्थेच्या मालमत्तेसंदर्भात कलम 36 (1) (अ) नुसार धर्मादाय सहआयुक्त यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.