

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक यश मिळाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. या निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. (Latest Pune News)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे आवाहन तरुणांना केले.
ते पुढे म्हणाले, की राष्ट्रवादी हा शिव, शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर तर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. यावरून काहीजण तुम्ही भाजपसोबत का गेलात? असा प्रश्न उपस्थित करतात. त्यावर आपल्याकडे ठोस उत्तर आहे की, पक्षाची स्थापना केल्यापासून आपल्याला पूर्ण बहुमत मिळाले नाही. काँग्रेसनंतर आपण शिवसेनेसोबतही सत्तेत सहभागी झालो होतो.
अशा प्रकारची राजकीय स्थिती सर्वांनी पाहिली आहे. आता केंद्रातसुद्धा इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागते. भाजपासोबत ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, मेहबुबा मुफ्ती आदि पुरोगामी विचाराच्या प्रादेशिक पक्षांचे नेते केंद्रीय सत्तेत सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी हा पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष असल्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्या विचारांशी तडजोड होणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले. राज्याचा विकास झाला पाहिजे, केंद्राच्या राज्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ही आपली भावना असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय विभागाला वाढीव निधी
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविल्याचा आरोप विरोधक आमच्यावर करत आहेत. वास्तविक, यंदा अर्थसंकल्प सादर करताना सामाजिक न्याय विभागाला 41 टक्के निधी वाढवून दिला होता, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पात एखाद्या समाजाला निधी द्यायचा असेल तर किती निधी द्यायचा हा प्रश्न येतो. त्यासाठी केंद्राने जातनिहाय जनगनणेचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही
मी राज्यात फिरत असताना सर्वांना सांगत असतो की सर्व सोंग करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. पण कधीकधी बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाही. मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का, असा सवाल अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी त्यांनी मी मंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, असे स्पष्ट केले.