लोणी धामणी : सततच्या पावसाने शेतीचे नुकसान; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

लोणी धामणी : सततच्या पावसाने शेतीचे नुकसान; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Published on
Updated on

लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा: शासनाने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा आघाडी सरकारने दोन वर्षापूर्वी केली होती. सत्तेच्या सारीपाटात संगीत खुर्चीच्या राजकारणात आजपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. त्या संदर्भातील काही ठिकाणी अर्जही भरले. परंतु पुढे काही झालेच नाही. त्यातच सतत पडत असणारा पाऊस आणि न मिळालेले अनुदान यामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संकटात आला आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षे शेतकर्‍यांना शेतीतून अपेक्षेप्रमाणे वार्षिक आर्थिक उत्पन्न मिळाले नाही. तसेच यावर्षी सततच्या जोरदार पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ सदृश परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली. तरी देखील शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही. कांदा पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने कवडीमोल किंमतीत कांदा विकावा लागला. भांडवलही वसूल झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी हा परिसर दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. यावर्षी या भागातील शेतकऱ्यांना शेतातून कवडीही उत्पन्न मिळाले नाही. पावसाने शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने आपली जबाबदारी पार पाडली व पंचनामे करून भरपाई दिली जाईल, असे सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत, त्यांचे पंचनामे करावेत किंवा सरसकट नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद गट अवसरी बुद्रुकचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळशिराम वाळुंज यांनी केली आहे.

शेतकर्‍यांना रब्बी हंगामाचे पीक कर्ज व त्यावरील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे आता तरी या शासनाने 50 हजार रुपये व आतापर्यंत पीककर्जावर भरलेले व्याज शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावे.
                                                                   – उद्धव लंके,
                                                              माजी सरपंच, लोणी

पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे झालेत, पण अजून भरपाई मिळाली नाही. ती शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी.
                                                            – महेंद्र वाळुंज,
                                                      माजी सरपंच, वाळुंजनगर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news