

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धायरी येथील रायकर मळा, जाधवनगर या भागांतील सिमेंट काँक्रीटचा रस्ता उखडला असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरातील दाट लोकसंख्या असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत आहे. अवजड वाहनांचीदेखील या रस्त्यावर सतत वर्दळ असते. यामुळे गेल्या काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते.
मात्र, आता पुन्हा त्यावर खड्डे पडले आहेत. रायकर मळा परिसरात या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली असून, अपघातही होत आहेत.
महापालिका प्रशासनाचे या रत्याकडे दुर्लक्ष होत आहे. अखिल जाधवनगर कमिटी फाउंडेशनने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण या समस्येकडे प्रशासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी फाउंडेशनचे सदस्या रमेश जावळकर, शैलेंद्र नलावडे, भानुदास राणेकर, संतोष पाटोळे, रत्नाकर सुर्वे, पंढरीनाथ रायक आदींनी केली आहे.
या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने दुरुस्तीनंतर तो पुन्हा लवकरच खराब होत आहे. या रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. परंतु, प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे?
– अश्विनी पोकळे, माजी नगरसेविका
या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून महापालिका प्रशासनाकडून त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात येत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.
– नरेश रायकर, उपअभियंता, रस्ते विभाग, महापालिका