

पुणे; पुढारी वृत्तसेवा : "आजही गीतरामायण सादर करणे, हे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. गदिमा आणि बाबूजींनी रचलेली ही अजरामर कलाकृती सादर करायला मिळणे, मी खूप भाग्यशाली आहे. हे अत्यंत कठीण काम असून, अजूनही सादरीकरण करताना व्यवस्थित अन् उत्तम कसे गाता येईल, यांच्या प्रयत्नात मी असतो.
त्यात सादरीकरण करताना बाबूजींचे स्वर नेहमी मनात रुंजी घालत राहतात. हा प्रत्यक्षपणे प्रभू श्रीराम यांनी मला दिलेला आशीर्वादच आहे. येत्या गुरुवारी पुण्यात सादरीकरण करताना रसिकांना या अजरामर कलाकृतीचा अस्सल सुरेल नजराणा अनुभवायला मिळेल," अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केली.
दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत, सहप्रायोजक गंगोत्री होम्स अॅण्ड हॉलिडेज् यांच्या सहकार्याने 'गीतरामायण' हा नयनमनोहर नृत्यांसह बहारदार कार्यक्रम गुरुवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला आहे. श्री रामभक्त हनुमान यांच्या जयंतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने फडके यांच्याशी संवाद साधला. फडके म्हणाले, 1 मे 1955 ला श्री रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणी केंद्रावर गीतरामायण पहिल्यांदा प्रसारित झाले. येथून गीतरामायणाचा प्रत्यक्ष सादरीकरणाचा प्रारंभ झाला. ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या अलौकिक शब्दप्रतिभेतून निर्माण केलेली आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी आपल्या अलौकिक स्वरप्रतिभेतून साकारलेली गीतरामायण ही अजरामर कलाकृती आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची तोड नाही.
गीतरामायणातील सुंदर शब्द आणि सुरेल स्वर हे अप्रतिम आहेत. या वर्षीच्या रामनवमीला म्हणजेच 30 मार्चला गीतरामायणाला 68 वर्षे पूर्ण झाली आणि अजूनही त्याची लोकप्रियता वाढत आहे, याचा अर्थ असा की, गदिमा आणि बाबूजींनी आपल्या अप्रतिम शब्द, स्वर, विद्वत्ता, अभ्यास, बुद्धिमत्ता आणि आकांक्षा यातून हा अप्रतिम नजराणा साकारला आहे. त्यांच्यामुळेच ही अद्वितीय कलाकृती निर्माण झाली आणि आजही या कलाकृतीची लोकप्रियता कायम आहे, याचा अभिमान वाटतो.
एकदाच अशा कलाकृती निर्माण होतात आणि तिची जादू प्रत्येक पिढीवर कायम राहते. गीतरामायणाचा आणि तुमचा प्रवास कसा सुरू झाला, यावर फडके म्हणाले, गीतरामायण जेव्हा पहिल्यांदा सादर झाले तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. बाबूजी आणि आई घरी यातील गीते सादर करायचे, ते माझ्या कानी पडायचे. गीतरामायणातील शब्द न शब्द कानावर पडत गेला.
बाबूजींबरोबर लहानपणी मी त्यांच्या कार्यक्रमांनाही जायचो. त्यामुळे गाण्याचे चांगले संस्कार माझ्यावर झाले. आईला एकदा विचारले, मी गीतरामायण प्रत्यक्षपणे सादर करू का? यावर आई म्हणाली, आधी गाऊन दाखव… मी आईसमोर गीते सादर केली. तिने मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. गाणे कसे गावे, शब्दांवर जोर कसा लावावा, भावना कशी व्यक्त करावी, स्वर कसे यायला हवे, अशा गोष्टी आईने सांगितल्या. त्या गोष्टींवर मी काम केले आणि सादरीकरण सुरू केले.
तेव्हा सुरू झालेला हा प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे. मुंबईमध्ये माझा पहिला कार्यक्रम झाला, रसिकांची दाद मिळाली. आताही या प्रवासात रसिकांची भरभरून दाद मिळत आहे आणि मी ठिकठिकाणी कार्यक्रम करीत आहे. कार्यक्रमात मी गीतरामायणातील 13 गाणी सादर करणार असून, त्यातील सुरेल प्रवास रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. रसिकांनी ही अजरामर कलाकृती पाहायला नक्की यावे.
लोकमान्य मल्टिपर्पजने केली प्रवेशिका वाटपाची व्यवस्था
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.च्या विविध कार्यालयांमध्ये मिळणार आहेत. नारायण पेठ, नवी पेठ, पर्वती, गुलटेकडी, सातारा रस्ता आणि सहकारनगर येथील कार्यालयांमध्ये मर्यादित प्रवेशिका उपलब्ध असून, रसिकांनी कार्यालयांमध्ये जाऊन प्रवेशिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गदिमा आणि बाबूजींनी गीतरामायण ही कलाकृती आमच्याकडून कुठल्या तरी अज्ञात शक्तीने रचून घेतल्याचे असे मान्य केले आहे. अज्ञात शक्ती ही सगळ्यांकडून असे काम करून घेत नाही, तर ज्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि अभ्यास आहे, त्यांच्याकडून असे अद्वितीय काम होते. दोघांच्याही बाबतीत हेच घडले.
गदिमांनी वेगवेगळे प्रसंग काव्यातून गुंफलेले आहेत तर बाबूजींनी त्या -त्या प्रसंगांना जिवंत करण्यासाठी वेगवेगळे राग वापरले. उदा. ः भूप, यमन कल्याण, मालकंस असे वेगवेगळे राग. गदिमांनी आपल्या शब्दप्रतिभेतून जसे प्रसंग उभे केले, तसे स्वर तिभेतून बाबूजींनी तो तो प्रसंग प्रत्यक्ष उभा केला आहे.
– श्रीधर फडके, ज्येष्ठ संगीतकार, गायक