

तळेगाव स्टेशन (पुणे), पुढारी वृत्तसेवा: लोणावळा- तळेगाव -पुणे लोकल अनेक वेळा उशिरा धावत असल्यामुळे चाकरमान्यांची, विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. लोणावळा येथून तळेगाव मार्गे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येकी १८ रेल्वे लोकल फेऱ्या आहेत. तळेगाव येथून पुण्याला जाणाऱ्या तीन आणि पुण्याहून येणाऱ्या तीन अशा लोकल सेवा आहेत. या लोकल अनेक वेळा उशिरा धावतात. कधी कधी काही लोकल रद्द केल्या जातात. यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ते कामावर वेळेवर पोहचू शकत नाहीत. यामुळे त्यांना वरिष्ठांकडून सतत ताकीद मिळते आणि कानउघडणी होते. तर कधी कधी अर्थिक नुकसानही होते.
तसेच चाकरमान्यांना वेळेवर घरी येता येत नसल्यामुळे घरगुती, कौटुंबिक कामे करण्यास अडथळे येतात. यामुळेही त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. त्यांना वेळेत शाळेत पोहचता येत नाही आणि वेळेत घरी येता येत नाहीत. यामुळे पालकांच्या काळजीत भर पडते. पुणेकडे जाणाऱ्या येणाऱ्या व्यावसायिकांचेही अर्थिक नुकसान होत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन लोकल वेळेवर धावण्याबाबत कार्यवाही करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
अनेक रेल्वे लोकल अनियमित धावत असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक यांची गैरसोय होत आहे.
– अनिल वेदपाठक,सामाजिक कार्यकर्ता.