दै.‘पुढारी’ आयोजित ‘गीतरामायण’ला बारामतीत अभूतपूर्व प्रतिसाद

दै.‘पुढारी’ आयोजित ‘गीतरामायण’ला बारामतीत अभूतपूर्व प्रतिसाद

बारामती; पुढारी वृत्तसेवा : 

गदिमा स्फुरतो राम
सुधीर कंठी गातो राम
श्रीधर गायनी खुलतो राम
तल्लिन श्रोतेवृंद विराम
गीतरामायणी रमतो राम
श्रीराम जय राम जय जय राम

या काव्यपंक्तींनुसार शनिवारच्या (दि. 27) सायंकाळी ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांच्या सुश्राव्य गायनाने बारामतीकरांनी अविस्मरणीय गीतरामायण कथा अनुभवली. येथील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहातील श्रोतावर्ग श्रीधर फडके यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झाला, कधी मनोमन हेलावला, तर कधी आसवांनी वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. दै. 'पुढारी' आयोजित व धूतपापेश्वर प्रस्तुत तसेच पॉवर्ड बाय श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर-बारामती, सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि. व अक्कुडाज् दूधकांडी यांच्या वतीने बारामतीत गीतरायामण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुविख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक म्हणून आपले नाव अजरामर करणार्‍या गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या नावाने बारामतीत उभ्या असलेल्या गदिमा सभागृहात हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. श्रीधरजींनी गायलेल्या गीतांनी रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, तर कधी भावविवश होण्यास भाग पाडले. 'गीतरामायण' म्हणजे गदिमांचे भावपूर्ण शब्द, भावगंधर्व सुधीर फडके ऊर्फ बाबूजींचे सुरेल संगीत अन् काळजापर्यंत पोहचणारा स्वर यांचा अतुलनीय संगम. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांनी सादर केलेली रामायणातील गीते ऐकताना त्याचीच आठवण श्रोत्यांना येत होती. श्रीधरजींच्या अनेक गीतांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या कार्यक्रमाला सायंकाळी पाचपासूनच बारामतीकरांची पावले गदिमा सभागृहाकडे वळायला लागली आणि सहा वाजताच गदिमा सभागृह गर्दीने भरून गेले. प्रास्ताविक व सत्कार समारंभानंतर साडेसहा वाजता गीतरामायणच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सभागृह 'जय श्रीराम'च्या जयघोषाने दुमदुमले. उत्तरोत्तर कार्यक्रम अधिकच रंगत गेला. साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमाची साडेनऊ वाजता सांगता झाली. त्यानंतर श्रीधरजी यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली. प्रास्ताविक दै. 'पुढारी'चे सहयोगी संपादक सुहास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. दै. 'पुढारी'चे पुणे युनिट मार्केटींग हेड संतोष धुमाळ यांनी आभार मानले.

दै. 'पुढारी' माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या 'गीतरामायण' कार्यक्रमामध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून आम्हास सहभागी होता आले, याचा आम्हाला खूप आनंद आहे. अतिशय सुंदर नियोजन, बारामतीकर रसिकांचा उत्तम प्रतिसाद आणि दै. 'पुढारी' टीमचे उत्तम सहकार्य, यामुळे आम्ही समाधानी आहोत. यापुढेही आम्ही दै. 'पुढारी'च्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ. दै. 'पुढारी' टीमचे मन:पूर्वक आभार.

                                                    – अशोक परदेशी
                                         डिस्ट्रिक्ट मॅनेजर, धूतपापेश्वर

दै. 'पुढारी' आयोजित श्रीधर फडके यांचे गीतरामायण भावले. सोबतीला असणार्‍या वाद्यवृंदाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. उत्कृष्ट निवेदनामुळे रसिक राममय झाले. प्रभू श्रीरामांची महती यानिमित्त पुन्हा रसिकांपर्यंत पोहोचली. बारामतीकरांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच ठरला.
                                                    – डॉ. आशिष जळक
                                    श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, बारामती

दै. 'पुढारी' समूहाने बारामती येथील 'गदिमा' सभागृहामध्ये 'गीतरामायण' हा कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमाला बारामतीमधील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल दै. 'पुढारी' टीमचे मन:पूर्वक आभार..
                                                    – विलास कासुर्डे
                                      बिझनेस हेड, अक्कुडाज ट्रेडिंग,पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news