

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : खामगाव – दहीटने जवळील नदीपात्रातील पुलाचे बांधकाम गेली तीन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचे काम त्वरित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. राहू बेटात असणार्या मिरवडी, दहीटने परिसरातील गावांसाठी सन 2020 मध्ये सुमारे अकराशे कोटी रुपयांच्या निधीतून पुलाचे काम हाती घेण्यात आले. या कामाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एनपी इन प्रोजेक्ट कंपनीने पुलाचा ठेका घेतला होता. परंतु, हे काम अर्धवट राहिले आहे.
सध्या या ठिकाणी कामगारांच्या राहण्यासाठी केलेल्या पर्त्यांच्या रिकाम्या चाळी आणि पुलावर रचलेले काही लोखंडी साहित्य एवढेच शिल्लक आहे. हा पूल अर्धवट सोडून संबंधित ठेकेदार गायब झाल्याचा संशय गावकर्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत दौंड येथील बांधकाम उपविभागाचे अधिकारी हरिश्चंद्र माळशिकारे यांना विचारणा केली असता, पुलाचे काम सुरू आहे. चार महिन्यांत काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
या पुलाच्या पश्चिम बाजूला काही मीटर अंतरावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून, या बंधार्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. बंधार्याच्या दोन्ही बाजूला कठडे नसल्याने मोठ्या वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात याच पुलावरून ट्रॅक्टरने ऊस वाहतूक होत असते. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा पूल लवकर करावा, अशी मागणी दहिटणे – मिरवडी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांनी केली आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे गेली तीन वर्षांपासून पूल अर्धवट असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत लक्ष द्यावे, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.