Dada Kondake: दादा कोंडके यांनी आपल्या भूमिकांमधून मनोरंजनासह प्रबोधनही केले : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : ‘मराठी चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांनी ज्या विविध भूमिका केल्या, त्यातून त्यांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर प्रबोधनदेखील केले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा आलेख पाहिला असता दादा कोंडके यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
मनोहर कोलते मैत्र संघातर्फे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या जन्म दिनानिमित्त ‘दादा कोंडके समाजरत्न’ पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. इतिहासाचे अभ्यासक व ‘पुढारी’चे पत्रकार दत्ताजी नलावडे, मनीषा घाटे- सराफ आणि श्रेया पासलकर यांना दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार प्रदान केला. संघाचे प्रमुख मनोहर कोलते उपस्थित होते. या वेळी राजीव पुणेकर यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ स्नेहछाया आणि नवरत्न या वृद्धाश्रमांना आर्थिक स्वरुपात देणगी दिली.
डॉ. सबनीस म्हणाले की, ’दादा कोंडके यांनी त्यांच्या भूमिकांमधून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर बेधडक भाष्य केले. दादा कोंडके यांच्या समकालीन चित्रपटांचा काळ पाहिला असता त्यांनी महाराष्ट्राला हसवणार्या महाराष्ट्रात रूपांतरित केले. कलाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागावर अधिराज्य गाजवत असताना त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी रौप्य महोत्सवी चित्रपट देण्याची एक परंपरा चालवली.’ भागवत थेटे यांनी सूत्रसंचालन केले. पराग शिळीमकर यांनी आभार मानले.

