पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाठीमागून गोळ्या झाडल्या असतील, तर एक गोळी समोरून भुवईतून घुसून डोक्याच्या मागे कशी गेली? याचे स्पष्टीकरण केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेले नाही, तसेच सीबीआयने महत्त्वाचे पोलिस अधिकारी तपासलेले नाहीत, असा दावा बचाव पक्षाने बुधवारी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 व 27 मार्च रोजी होणार असून, बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद सुरूच राहणार आहे. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यामध्ये बचाव पक्षाचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अंतिम युक्तिवाद सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला दाभोलकरांवर गोळ्या झाडताना स्वतः पाहिलेले नाही, तसेच कळसकर याचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले होते, अशी साक्ष एका साक्षीदाराने दिली आहे, तर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर पळून जाणार्या हल्लेखोरांना पाहिल्याचा दावा करणार्या साक्षीदाराच्या साक्षीतही तफावत दिसत आहे. त्यामुळेच सीबीआयने आरोपींची ओळख परेड केलेली नाही, असा युक्तिवाद इचलकरंजीकर यांनी केला. गुन्हा घडल्यानंतर अंनिसचे कार्यकर्ते आपल्याकडे आले होते, असेही एका साक्षीदाराने मान्य केले असल्याचे इचलकरंजीकर यांनी सांगितले. मुख्य आरोपींकडे पिस्तूल सापडले नसल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
हेही वाचा