

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असताना फार्मसीची प्रवेशप्रक्रिया मात्र रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शहरात डी. फार्मसीसाठी 20 हजारांपेक्षा अधिक तर, बी. फार्मसी, फार्म डीसाठी 15 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
फार्मसी अभ्यासक्रमाकडे वाढला कल
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत निर्माण झालेल्या परिस्थितीने औषधांच्या मागणीत वाढ झाली. कोरोनाच्या कालावधीत फार्मासिस्टने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. बारावी विज्ञान अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. शहरातील 17 महाविद्यालयांत डी. फार्मसी तर, 15 महाविद्यालयांत बी. फार्मसी अभ्यासक्रम आहे. डॉक्टर ऑफ फार्मसी (फॉर्म डी) अभ्यासक्रम 4 महाविद्यालयांमध्ये सुरू आहे.
अंतिम गुणवत्ता यादी 19 नोव्हेंबरला
बी.फार्मसी, फार्म डी. प्रवेशाच्या नोंदणीसाठी यापूर्वी 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. ही मुदत आता 12 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. 15 ते 17 तारखेदरम्यान आक्षेप घेता येतील. तर, अंतिम गुणवत्ता यादी 19 नोव्हेंबरला जारी होणार आहे.
डी. फार्मसी नोंदणीसाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत
राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी. फार्मसी नोंदणी व कागदपत्रे पडताळणीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. तर,
9 नोव्हेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच, 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान आक्षेप नोंदविण्यात येतील आणि 13 नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.