पुणे : पुढारी वृत्तसेवा : सायबर चोरट्याने पोलिस, सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगून कर्वेनगर येथे राहणार्या 67 वर्षीय डॉक्टरांची 30 लाख 57 हजार 502 रुपयांची फसवणूक केली. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे अशाच प्रकारे सायबर ठगांनी त्यांना यापूर्वीही गंडा घातला होता. याप्रकरणी कर्वेनगर येथील 67 वर्षीय ज्येष्ठ डॉक्टारांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी व्हॉट्सअॅप वापरकर्ते, विविध बँकधारकांवर फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 7 फेब—ुवारी ते 14 एप्रिल 2024 यादरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर ठगांनी डॉक्टरांसोबत व्हॉट्सअॅप वर व्हिडीओ कॉल करून मुंबईमधून प्रदीप शर्मा बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला. व्हिडीओ कॉल केला असला तरीही पुढच्या व्यक्तीचा चेहरा मात्र दिसत नव्हता. या वेळी फिर्यादी डॉक्टरांना तुम्ही मनी लाँड्रिंग केल्याचे सांगण्यात आले. तसेच, तुमचा नंबर पोलिसांना देत असल्याचे सांगून या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याची भीती दाखवण्यात आली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत असून, तुम्ही बाहेर जाऊ नका, कोणाला काही सांगू नका, असे सांगण्यात आले.
यानंतर सायबर चोरट्यांनी डॉक्टरांचा आधार नंबर विचारला आणि त्यानंतर एक फॉर्म भरून घेतला. या फॉर्ममध्ये त्यांच्या सगळ्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली, तसेच बँक खात्यात किती रक्कम आहे हेसुद्धा विचारले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी डॉक्टरांना तुमच्या बँक खात्याचा तपास करायचा असल्याचे सांगून पहिल्यांदा आरटीजीएसने पैसे पाठवायला सांगितले. यानंतर वेगवेगळी कारणे सांगून 30 लाख 57 हजार 502 रुपये पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले. तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे)निलकंठ जगताप करत आहेत.
सायबर चोरट्यांनी डॉक्टरांची दुसर्यांदा फसवणूक केली आहे. एप्रिल 2022 मध्ये सुद्धा डॉक्टरांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली होती. त्या वेळी डॉक्टरांची 49 हजारांची फसवणूक करण्यात आल्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
हेही वाचा