

येत्या 25 जुलैपर्यंत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करता येणार
पुणे : विधी तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. तीन वर्षे प्रवेशासाठी आत्तापर्यंत 57 हजार 892 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरात तीन वर्षे एलएलबी अभ्यासक्रमासाठी अंदाजे 21 हजार जागा उपलब्ध आहेत. परंतु, प्रवेशासाठी यंदा विक्रमी 57 हजारांवर अर्ज आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा कट-ऑफ मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीनपटीने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच मागील गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाविद्यालयांचा कटऑफ देखील अधिक राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांत विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरी अथवा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एलएलबीचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे. त्यातून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवेशासाठी चुरसही वाढली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलमार्फत विधी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सीईटी सेलने ’एलएलबीच्या कॅप फेरी’साठी अर्ज भरण्यास 30 जूनला सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी संपली, तर ऑनलाइन कागदपत्रे पडताळणीची मुदत शुक्रवारी संपणार आहे. यंदा एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी 57 हजार 892 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 51 हजार 334 विद्यार्थ्यांनी सर्व माहिती भरून अर्ज अंतिम केला आहे. तसेच 37 हजार 720 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण केली आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
गेल्या वर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 21 हजार 71 जागा उपलब्ध होत्या. त्या वेळी 20 हजार 374 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यातून बहुसंख्य महाविद्यालयांमधील जागा भरल्या गेल्या होत्या. यंदाही एलएलबीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रवेशासाठी रंगतदार चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.