

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खंडणी दिली नाही म्हणून बारामती शहरातील हॉटेलचालकासह कामगारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चार सराईत आरोपींना न्यायालयाने दहा दिवस 'मोक्का' कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा आदेश दिला.
आदेश संजय कुचेकर (वय 22), साहिल अय्याज शिकीलकर (वय 19), ऋषीकेश उर्फ पप्पू सुनील चंदनशिवे (वय 21) आणि तेजस बाळासाहेब बच्छाव (वय 23, सर्व रा. बारामती) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी एकावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तसेच खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे यांसह विविध कलमांनुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 38 वर्षांच्या हॉटेलचालकाने फिर्याद दिली आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फलटण रोड, बारामती येथे घडली. त्यादिवशी आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कामगाराला लाथाबुक्क्याने, कोयत्याने, तसेच काचेच्या बाटलीने मारहाण केली तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींवर 'मोक्का' कायद्यानुसार कारवाई केली. त्यापैकी चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी संजय कुचेकर हा टोळीप्रमुख असून, त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी संघटितपणे हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करत असून, त्याबाबत तपास करायचा आहे तसेच त्यांच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्यासाठी आरोपींना 'मोक्का' कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.