

वर्षा कांबळे :
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेची जाधववाडी शाळा खर्या अर्थाने स्मार्ट झाली आहे. नेहमीच शैक्षणिक दर्जा ढासळलेला अशी चर्चा पालिकांच्या शाळांची आहे. पण याला छेद देत हमखास इंग्रजी वाचन उपक्रमाव्दारे याठिकाणी आता पहिलीतील मुलगीदेखील दहावीचे इंग्रजीचे पुस्तक खाडखाड वाचू लागली आहे. यापूर्वी पालिकेच्या शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठीदेखील नीट लिहिता वाचता येत नव्हते, तर इंग्रजी वाचन ही दूरची गोष्ट होती; परंतु सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट डिजिटल शिक्षण दिले जात आहे.
त्यामुळे शिक्षकदेखील प्रयोगशील व तंत्रस्नेही बनले आहेत. शाळेमध्ये मुलांना आवडीने विषय शिकवले जातात. त्यामुळे मुले अभ्यास आवडीने करू लागली आहेत. जाधववाडी मुलींच्या शाळेतील उपशिक्षक संदीप वाघमारे यांनी मुलींना न अडखळता इंग्रजी वाचता यावे, यासाठी हमखास इंग्रजी वाचन हा उपक्रम सुरू केला. यामध्ये येथील विद्यार्थिनींकडून दररोज इंग्रजी वाचनाचा सराव करून घेतला जात आहे. मुलींसाठीदेखील हा एक आनंददायी उपक्रम असल्याने विद्यार्थिनीदेखील आवडीने सराव करतात. त्यामुळे साईजीवन प्राथमिक विद्यालय ही जाधववाडीची मुलींची शाळा स्मार्ट झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शाळेत दररोजच्या त्याच त्या प्रकारच्या शिकवण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकविल्यास मुलांना अभ्यास लाभदायी ठरला आहे, असा अनुभव शाळेतील शिक्षक सांगतात.
पहिल्यांंदा इंग्रजीतील मुळाक्षरांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर फोनेक्स पद्धतीने उच्चार कसे करायचे हे शिकविले. अक्षराला व्यंजन लावल्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा, स्पेलिंग कसे तयार होते. हे शिकविले. मात्र, त्यांच्याकडे कंन्टेट नव्हता. त्यासाठी आम्ही पुस्तकांची मदत घेतली. त्यातून त्यांनी फोनेक्स साउंड पक्के करून घेतले. त्यानंतर मुलींना अठराशे शब्दांचा सराव दिला. नंतर वाक्यांचा सराव घेतला. हा उपक्रम गेली दीड महिना राबवित आहे.
– संदीप वाघमारे, उपशिक्षक, साईजीवन प्राथमिक विद्यालय, जाधववाडीमाझ्या मुलीला बालवाडीमध्ये न घालता आम्ही थेट पहिलीमध्ये प्रवेश घेतला. तरीदेखील माझी मुलगी हमखास इंग्रजी वाचन उपक्रमामुळे उत्तम इंग्रजी वाचते. तिला पहिली ते दहावीपर्यंतचे कोणतेही इंग्रजी पुस्तक दिल्यास ती सफाईदारपणे वाचू शकते.
– सीमा सूर्यवंशी, पालक