पिंपरी : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर गर्दी ; मंदिर निर्माणामुळे भाविकांची वाढली ओढ !

पिंपरी : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर गर्दी ; मंदिर निर्माणामुळे भाविकांची वाढली ओढ !
Published on
Updated on

वडगाव मावळ : संतश्रेष्ठ तुकोबारायांची चिंतन भूमी असणार्‍या भंडारा डोंगरावर त्यांच्या आकाशा एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे सकल वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर मंदिर बांधकामाने गती घेतली असून, काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवास देखील भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून अयोध्यानगरीतील श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान होत आहे ते चंद्रकांत सोमपुरा व निखिल सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिरच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे. गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे.

मंदिराची लांबी 179 फूट, उंची 87 फूट व रुंदी 193 फूट असून मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट 34 फूट बाय 34 फूट असून 13.5 बाय 13.5फूट आकाराची एकूण 5 गर्भगृहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तिमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून, त्यावर 900 वैष्णवांच्या प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य – दिव्य शिल्प साकारले जाणार आहे. हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर मंडळी, भाविक या कार्याला मदत करीत आहेत.

माघ शुद्ध दशमी व जगदगुरू तुकोबारायांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने गेली 70 वर्षांपासून सुरू असणार्‍या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास दि.26 जानेवारीपासून सुरुवात झाली. पहाटे काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाली. या वेळी हभप शंकरमहाराज मराठे, हभप सुदाममहाराज भोसले बाबा, गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व करणारे हभप नानामहाराज तावरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव काशीद आदी उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनी यावर्षी या सोहळ्याची सुरुवात होत असल्याने ध्वजारोहणही करण्यात आले.

सकाळी हभप नानामहाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकोबारायांच्या गाथेचे पारायण सुररू करण्यात आले. या पारायणासाठी सालाबादप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून आलेले हजारो भाविक सामील झाले आहेत. सायंकाळी 4.30 ते 6.30 या दरम्यान भागवताचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे पसायदानावर निरुपण झाले. पहिल्या दिवशी हभप पोपटमहाराज कासारखेडेकर यांची कीर्तनसेवा झाली, तर दुसर्‍या दिवशी हभप एकनाथ महाराज चत्तरशास्त्री यांची कीर्तनसेवा झाली. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी सप्ताहाच्या कालावधीमध्ये सकाळच्या न्याहारीसह दुपारी व रात्री असे दोन वेळा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news