

बावडा : पुढारी वृत्तसेवा : बावडा परिसरात चार दिवसापासून पंढरपूरकडे चाललेल्या पालखी सोहळ्यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे, त्यामुळे बावडा व परिसरातील वातावरण 'विठ्ठलमय' झाले आहे. पालखी सोहळ्यांना पंढरपूरकडे जाण्यासाठी बावडा गाव हे मध्यवर्ती ठिकाण झाले आहे. पुणे यवत-पाटस-भिगवण-इंदापूर मार्गे येणारा रस्ता व पुणे-जेजुरी-मोरगाव-बारामती-वालचंदनगर मार्गे येणारा रस्ता हा बावडा येथे एकत्र येतो. तो पुढे अकलूज, पंढरपूरकडे जातो. बावडा ते पंढरपूर अंतर अवघे 50 किलोमीटर आहे. त्यामुळे सर्व भागांतून येणार्या पालख्या ह्या शेकडो वर्षांपासून बावडामार्गे पंढरपूरकडे रवाना होतात.
पालख्यांशी बावडा व परिसरातील गावांमधील नागरिकांचे पिढ्यान् पिढ्यापासून ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत, त्यामुळे बावडा येथे असंख्य पालख्या मुक्कामासाठी तसेच दिवसभर विसाव्यासाठी थांबत आहेत. पालख्या व दिंड्यांमधील वारकर्यांच्या चहापान, भोजनाची व्यवस्था स्थानिक नागरिक मनोभावे करीत आहेत, असे दीपक घोगरे (सुरवड), हरिश्चंद्र काकडे व रमेश काकडे (बावडा), प्रदीप बोडके (पिंपरी बु.), प्रतीक घोगरे (गणेशवाडी) यांनी सांगितले. रविवारीही (दि. 25) दिवसभर पालख्यांमुळे बावडा परिसरात रस्ते वारकर्यांनी फुलून गेले होते.