नवी सांगवी : महापालिकेच्या दवाखान्यात सर्दी, तापाच्या रुग्णांची गर्दी

नवी सांगवी : महापालिकेच्या दवाखान्यात सर्दी, तापाच्या रुग्णांची गर्दी

नवी सांगवी : नवी सांगवी येथील महापालिकेच्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालय येथे सोमवारी दिवसभरात 220 रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात आले होते. तर पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या दवाखान्यात शंभराहून अधिक रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात आले होते. येथील महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, घसा, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे सांगवी, पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या दवाखान्यात रुग्ण गर्दी करून येत असल्याचे पहावयास मिळत आहे. या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला आठवडाभर बरा होत नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. सकाळी अकरानंतर उन्हाच्या झळा, सायंकाळपासून सकाळपर्यंत गारठा, सतत हवेत गारवा या बदलामुळे नागरिक आजारी पडण्याच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

धुळीचे प्रमाण वाढल्याने वातावरण दमट आहे. यामुळे धुळीचा संसर्ग असलेल्यांना सर्दी खोकल्याचा त्रास व घशात सतत खवखव होत आहे. याचा सर्वाधिक त्रास दमा असलेल्यांना होत आहे. महापालिकेच्या दवाखान्यात सोमवारी सांगवीत 220 तर पिंपळे गुरवमध्ये 100 हून अधिक रुग्ण उपचारासाठी गर्दी करून येत होते.

गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढल्याने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे हातावर वर्ण येणे, ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज येणे, असे त्रास होतात. तसेच सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी यासारखे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये बालक, अल्पवयीन, नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना हवेत गारवा तसेच वाढत्या थंडीमुळे आजारपण दिवसेंदिवस उद्भवत आहेत.

महापालिकेच्या येथील दवाखान्यात मलेरिया, टायफाईड, डेंग्यू यासारखे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्या रक्ताची तपासणी करून घेण्यात येत आहे. सोमवारी सांगवीत 38 तर पिंपळे गुरवमध्ये 15 रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आले नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. लहान बालकांना गोवरचे अतिरिक्त लसीकरण देखील देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सध्या कडाक्याची थंडी आहे, त्यातच हवामान कोरडे असल्याने धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्दी, वात येणे, वर्ण येणे, ओठ फाटणे, खाज येणे, यासारख्या समस्या उद्भवतात. इतर ऋतूच्या तुलनेत थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम आहे. मात्र, आरोग्य बिघडू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. थंडी, ताप यासारखी फिव्हरची लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात तपासणी करावी.

                                          -डॉ. तृप्ती सागळे, सांगवी वैद्यकीय अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news