

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची दुरवस्था झाली आहे. योजनेला बारा वर्षे होऊनदेखील ही योजना सुरू झालेली नाही. मांडवगण फराटा, वडगाव रासाई व सादलगाव या तीन गावांचा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असे ग्रामस्थांना वाटत होते. परंतु मांडवगण फराटा येथील योजना सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा आहे.
शिरूरच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, सादलगाव आदी वाड्या- वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाने 11 कोटी 15 लाख रुपये खर्च केले. यातून पाणी साठवण तलाव, पंपिंग स्टेशन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. नोव्हेंबर 2020 मध्ये या पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळाही मोठा गाजावाजा करत करण्यात आला, परंतु योजना सुरू होऊ शकली नाही. पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटाव्यात म्हणून शासनाने योजना मंजूर केल्या.
परंतु, या योजनांचे ठेकेदारांनी संबंधित गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामकाज केले नाही. योजनेचे लोकार्पण होऊन तीन वर्षे उलटली तरीही या योजनेचे पाणी ग्रामस्थांपर्यंत अजूनपर्यंत पोहचलेले नाही. पुढील काळात ते मिळण्याची शक्यता नाही. या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी मांडवगण फराटा हद्दीतील गणपतीमाळ नजीक असलेल्या गायरान जमिनीवर मोठा तलाव खोदण्यात आला आहे. परंतु, त्याची दुरवस्था झाली आहे. दरम्यान गेले बारा वर्षांपासून ही योजना धूळ खात पडली आहे. अद्याप एकही थेंब तीन गावांमध्ये आलेला नाही. या योजनेचे पाणी तीन गावांना नक्की कधी मिळणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.
हेही वाचा