

नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील काले, तांबे, येणेरे व दातखिळेवाडी परिसरात मंगळवारी (दि. 13) दुपारी ढगफुटीसदृश जोरदार आवकाळी पाऊस झाला. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी काले गावचे सरपंच कुलदीप नायकोडी यांनी केली. (Latest Pune News)
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वार्याने आंब्याच्या झाडावरील कैर्या मोठ्या प्रमाणात गळाल्या. बाजरीचे पीक देखील भुईसपाट झाले. शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजला.
अनेक शेतकर्यांचे शेताचे बांध वाहून गेले. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. कृषी व महसूल विभागाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ म्हणाले, दुपारी साडेबारा-एक वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. त्यामुळे शेती व पिकांचे नुकसान झाले. ओढ्यांना देखील पूर आला. आंब्याच्या बागांचे नुकसान झाले.
टोमॅटो व झेंडूच्या पिकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने झाडांच्या मुळ्या सडून पिकांना फटका बसणार आहे. दातखिळेवाडी परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याने बाजरी व टोमॅटो पिकाचे नुकसान झाले तसेच आंब्याच्या कैर्या पडल्या.
आम्हा शेतकर्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे काले येथील आंबा उत्पादक शेतकरी सहदेव घोगरे व रवी पानसरे यांनी सांगितले. दरम्यान, जुन्नरच्या निवासी तहसीलदार सारिका रासकर यांनी काले गावाला भेट देत पिकांच्या नुकसानीची पाहणी करतआढावा घेतला.