

खेड: पाईट (ता. खेड) येथे दि. 16 फेब्रुवारी 2012 रोजी घडलेल्या घटनेतील 26 आरोपींना राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी निर्दोष मुक्त केले. अॅड. सचिन आरुडे यांनी ही माहिती दिली. मंगळवारी (दि. 13) झालेल्या या निकालाकडे परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते.
पाईट गावात रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. या व्यक्तीला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी नातेवाइकांनी त्या ट्रकचालकाकडे आर्थिक मोबदल्याची मागणी केली. त्या वेळी गावातील इतर लोकांनी देखील आर्थिक मदतीसाठी ट्रकचालकाकडे तगादा लावला. (Latest Pune News)
त्यावरून गावकरी यांनी दंगल केली व पोलिसांना धक्काबुक्की केली. सरकारी कर्मचार्यांच्या गाड्या फोडल्या. अपघात केलेला ट्रक पेटवून दिला, अशी तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली होती. दंगलसदृश गुन्हा दाखल झाल्याने गावकरी व नातेवाईक हवालदिल झाले होते.
राजगुरुनगर सत्र न्यायालयात 2014 पासून म्हणजे तब्बल 12 वर्षे हा खटला सुरू होता. दरम्यानच्या काळात यातील काही आरोपी मृत पावले. पोलिसांनी जवळपास 400 च्या जमावाने हल्ला केल्याची नोंद केली होती. प्रत्यक्षात 22 पुरुष आणि 4 महिला अशी आरोपींची संख्या होती. शिवाय घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी नसल्याने सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
अॅड. सचिन बाळासाहेब आरुडे व अॅड. प्रसाद हुलवळे यांनी 18, तर उर्वरित इतर आरोपींच्या वतीने अॅड. संजय दळवी, अॅड. सुनील सांडभोर, अॅड. महेश गोगावले यांनी कामकाज पाहिले. अॅड. एम. डी. पांडकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. सर्व आरोपींविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने अॅड. सचिन आरुडे, अॅड. प्रसाद हुलवळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालय ए. एस. सय्यद यांनी मंगळवारी (दि. 13) सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.