

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाकडून गुन्हेगारांची मुस्कटदाबी आणखी तीव्र करण्यात आली आहे. मागील सात दिवसांत वाकड, एमआयडीसी भोसरी, देहूरोड आणि निगडी परिसरातील सातजणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, 11 काडतुसे, सहा कोयते, कार आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पथकाच्या या कारवाईमुळे गुन्हेगार सैरभैर झाल्याचे चित्र आहे. पहिल्या कारवाईत कृष्णा सीताराम पाल (19, रा. आकुर्डी) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी पाल याने इंस्टाग्रामवर कोयता घेऊन व्हिडीओ व्हायरल केला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. दुसर्या कारवाईत शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गणेश रघुनाथ बनसोडे (25, रा. निगडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी बनसोडे तडीपार असूनही निगडी परिसरात आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने घरातून त्याची उचलबांगडी केली.
तिसर्या कारवाईतर तडीपार असलेला अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (28, रा. पिंपरी) याला अटक केली. आरोपी चांड्या देहूरोड येथे येणार असून तिथून तो मुंबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून आरोपी अतुल पवार याच्या मुसक्या आवळल्या. पवार याच्या विरोधात पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, पिस्तूल, कोयते, तलवारी बाळगणे असे 19 गुन्हे दाखल आहेत.
चौथ्या कारवाईत अर्जुन हिरामण धांडे (वय 18), सचिन संतोष गायकवाड (वय 19, रा. चिंचवड) यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकांनी बंद पुकारला होता. त्यावेळी एक रिक्षा चालक विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली.
तसेच, रिक्षाचेही नुकसान केले. याचा व्हिडीओ बनवून मारहाण करणार्याने तो सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथकाने आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांच्याकडून पाच कोयते, एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
पाचव्या कारवाईत तुषार उर्फ आप्पा सुभाष गोगावले (29, रा. वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल, 11 काडतुसे, एक कार जप्त केली आहे. आरोपी तुषार गोगावले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्नाचे प्रत्येक दोन, दरोड्याचा प्रयत्न आणि गर्दी मारामारीचा प्रत्येक एक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकाची देखील कारवाई झाली असून त्यात तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. ही कारवाई उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहर परिसरातील गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या सोशल मीडियावर पाळत ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आपल्या परिसरात अशा प्रकारे कोणी दहशत पसरवण्याचे काम करीत असल्यास गुंडा विरोधी किंवा नजीकच्या पोलिसांना याबाबत माहिती द्या, माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
– हरीश माने, सहायक पोलीस निरीक्षक, गुंडा विरोधी पथक