Crime News : कोयत्याच्या धाकाने मोबाईल पळविणार्‍या तिघांना अटक

Crime News : कोयत्याच्या धाकाने मोबाईल पळविणार्‍या तिघांना अटक

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल चोरणार्‍या सराइतांना अटक करण्यात आली आहे. इस्तेखार इंतेजार शेख (वय 19), राजेश भगवान पाखरे (वय 19), गुरप्रित श्रीपती घोडके (वय 19, तिघेही रा. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 82 हजार रुपयांचे पाच मोबाईल व स्कुटी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जप्त केली.
रांजणगाव एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील कंपनीत जाणा-या कामगारांना अडवून, त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल पळविण्याच्या घटनांत वाढ झाली होती.

गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात रांजणगाव येथून फिर्यादी गजानन सुखलाल राऊत हे जात असताना त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी अडवून कोयत्याचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल हिसकावला. दुसर्‍या घटनेत फिर्यादी मोहम्मद हुसेन मंसुरी हे पेप्सिको कंपनीसमोरून जात असतांना त्यांना स्कुटीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी रस्ता विचारण्याचा बहाण्याने अडविले. त्यानंतर त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम पळविली. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली.

सदर आरोपींकडे तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे शिक्रापूर, कोतवाली, रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, हवालदार विलास आंबेकर, वैजीनाथ नागरगोजे, तेजस रासकर यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news