टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या साबळेवाडी येथील विद्युत रोहित्रवर सोमवारी (दि.१३) रात्री दिवाळी पाडव्याच्या पूर्व संध्येला चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात कांदा लागवडीची लगबग सुरू असताना वीज पुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रकार वारंवार घडू लागल्याने महिनाभरापूर्वी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी लक्ष घालून कठोर कारवाईसाठी कडक अंमलबजावणी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, एकनाथ पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करत
या प्रकरणी काहींना गजाआड केले. मात्र महिनाभराच्या आतच विद्युत रोहित्रची चोरी झाल्याने हे चोर शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
या विद्युत रोहित्र चोरी दरम्यान चोरट्यांनी रोहित्र खांबावरून खाली फेकले; मात्र त्यानंतर या रोहित्रमध्ये तांबे नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्याचे नुकसान केले. पाडव्याच्या मुहूर्तावर चोरांचा डाव फसला, मात्र रोहीत्राचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि महावितरणची हानी झाली. या चोरांना तात्काळ जेरबंद करा, अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे. उपाययोजना म्हणून महावितरणकडून प्रत्येक रोहित्रास वेल्डिंग करण्याचे काम सुरू असून यामुळे या चोऱ्यांच्या प्रकारास आळा बसेल, असा विश्वास शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा