पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लंडनहून विमानाने मुंबई येथे आलेल्या प्रवाशाची बॅग विमानतळावर मिळाली नाही. याबाबत प्रवाशाने विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत विमानतळ प्रशासनाने बॅग कुरिअरने त्यांच्या घरी पाठविली. मात्र, या बॅगेत असलेले साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. 11 डिसेंबर रोजी वाकड येथे हा प्रकार उघडकीस आला.
सचिन हरी कामत (44, रा. वाकड, मूळ रा. युनायटेड किंगडम) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी कामत विमानाने लंडनहून मुंबईला आले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार बॅग सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या. या बॅगमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि 152 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना बॅग मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी बॅगांचे आयडी मुंबई विमानतळावर जमा केले. त्यानंतर एका कुरिअरद्वारे त्यांना त्यांच्या बॅग वाकड येथे मिळाल्या. त्यांनी बॅग तपासल्या असता सात लाख 60 हजारांचे दागिने मिळून आले नाहीत. वाकड पोलिस तपास
करीत आहेत.
हेही वाचा