पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंध ठेवण्याच्या मागणीस नकार देत हा प्रकार पोलिसांना सांगणार असल्याचे म्हटल्याने सोसायटीमध्ये हाऊसकीपिंगचे काम करणार्या महिलेचा प्लंबरने मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 13) रावेत येथील एका सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये घडली.प्रतिमा प्रमोद यादव (32, रा. रावेत, मूळ रा. बिलासपुर, छत्तीसगढ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरिफ झुल्फिकर मल्लीक (21, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेचे पती प्रमोद रामेश्वर यादव (वय 34) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद यादव यांचे कुटुंब रावेत येथील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले आहेत. प्रमोद यादव आणि त्यांची पत्नी प्रतिमा हे दोघेही त्याच सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करत होते. तर, आरोपी हा त्या सोसायटीमध्ये प्लंबिंगचे काम करत होता. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रतिमा कामावर गेल्या.
सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये काम करत असताना आरिफ याने त्यांच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच, आपण प्रेमसंबंधात राहू, असे म्हटले. त्याला प्रतिमा यांनी विरोध केला. तसेच, हा प्रकार आपल्या पतीला व पोलिसांना सांगणार असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरिफ याने प्रतिमा यांचा गळा आवळला. तसेच, हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रतिमा यांना भिंतीवर ढकलून दिले. यामध्ये प्रतिमा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करत पोलिसांनी आरोपी आरिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
हेही वाचा