Pimpri News : परिचारिकांचे काळ्या फिती लावून काम | पुढारी

Pimpri News : परिचारिकांचे काळ्या फिती लावून काम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांतील परिचारिकांनीही जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात गुरुवारी (दि. 14) सहभाग घेतला. मात्र संपामुळे त्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच निदर्शने केली. शहरातील महापालिकेची 7 रुग्णालये, 1 नेत्र रुग्णालय तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील परिचारिकांनी काम बंद न ठेवता काळ्या फिती लावून संपात सहभाग नोंदविला.

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नर्सेस असोसिएशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. या रुग्णालयात कायमस्वरूपी सेवेत असणार्‍या 131 व कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या 291 परिचारिका या संपात सहभागी झाल्या होत्या. नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. मानधनावर काम करणार्‍या परिचारिकांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे. केंद्रीय परिचारिकांना मिळतात त्याप्रमाणे राज्यातील परिचारिकांनाही भत्ते मिळावेत, आदी मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button