Crime News : अवैध वास्तव्य करणार्‍या बांगलादेशींना अटक

Crime News : अवैध वास्तव्य करणार्‍या बांगलादेशींना अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात अवैध वास्तव्य करणार्‍या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई निगडी – काळभोरनगर येथील अंकुश चौकात करण्यात आली. आरोपींपैकी तीन जणांनी गोवा येथून पासपोर्टही काढल्याचे समोर आले आहे. या पासपोर्टद्वारे ते लवकरच परदेशात जाण्याच्या तयारीत होते. रॉकी सामोर बरूआ (28), जयधन अमीरोन बरूआ (28), अंकुर सुसेन बरूआ (26), रातुल शिल्फोन बरूआ (28), राणा नंदन बरूआ (25, सर्व रा. चित्तागोंग, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, जिकू दास ऊर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे) हा पसार आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस शिपाई सुयोग लांडे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी बांगलादेशी नागरिक असून ते अवैधरित्या शहरात राहत होते. त्यांनी कोणत्याही प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत – बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतातील पश्चिम बंगाल -सिलिगुडी येथे घुसखोरी केली. तेथे त्यांनी बनावट जन्म दाखला आणि इतर कागदपत्रांद्वारे आधारकार्ड बनवले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील अंकुश चौक साईनाथनगर येथील चाळीत बेकायदा वास्तव्य करत होते. याठिकाणी त्यांनी आधारकार्डवरील पत्ते बदलून पुण्यातील पत्ते टाकले. बनावट कागदपत्रांचा वापर करीत तीन आरोपींनी गोवा येथून पासपोर्टही काढून घेतले. इतर दोन आरोपींचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी छापा टाकून पाच आरोपींना जेरबंद केले. निगडी पोलिस तपास करत आहेत.

यापूर्वी पकडले होते बांगलादेशी

पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यापूर्वीदेखील बांगलादेशी नागरिकांना पकडल्याची नोंद आहे. निगडी, भोसरी, चिखली आणि महाळूंगे परिसरातून आतापर्यंत एकूण 14 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात सहा महिलांचा समावेश आहे. मोशी येथे नुकतेच दोन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी आता सर्च ऑपरेशन तीव्र केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news