पुणे : पुढारी वृत्तसेवा : एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत विविध ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने दिलेले अर्ज मागे घेण्यासाठी निवृत्त कर्नलकडे 25 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून खंडणी घेण्यासाठी आलेल्या एकाला 50 हजारांची खंडणी घेताना कोंढवा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
विजय जतन लोंढे (रा. धोबी, दहिसर, पश्चिम मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचा मुख्य साथीदार अमर कसबे याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणी व इतर असे तीन गुन्हे दाखल आहेत. याबाबत निवृत्त कर्नल नविन्दर सिंह बेवली (वय 46, रा. क्लोअर हिल्स, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नविन्दर सिंह बेवली हे निवृत्त कर्नल आहेत. त्यांचा रेडियन्ट सेक्युरिटी म्हणून व्यवसाय आहे. त्यांना आरोपींनी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत आयकर विभाग, पोलिस अशा ठिकाणी अर्ज दिले होते. त्या अर्जांवर कारवाई नको असेल व अर्ज मागे घ्यायचे असतील, तर आरोपी कसबे हा त्यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागत होता. परंतु, खंडणी देणे मान्य नसल्याने बेवली यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
त्या वेळी कसबेने विजय लोंढे याला पैसे घेण्यासाठी बेवली यांच्या ऑफिसच्या खाली पैसे घेण्यासाठी पाठविले होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी विजय लोंढेला लाच घेताना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस अंमलदार गणेश चिंचकर, अभिजित जाधव, सोमनाथ महानवर आणि तुषार डिंबाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कसबेने कर्नल यांना ऑफिसजवळ माणूस पाठवतो, त्याच्याकडे 25 लाख रुपये द्या, असे सांगितले होते. जर यामध्ये काही केले, तर सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिली होती.
हेही वाचा