

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोंढापुरी येथील जमिनीची एकाला विक्री करण्यासाठी साठेखत करून देऊन काही रक्कम घेतल्यानंतर त्या जमिनीची परस्पर विक्री केल्याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात पुष्पा रवींद्र साळुंखे (रा. जोशीवाडा, गोडोली, ता. सातारा, जि. सातारा) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुष्पा साळुंखे यांच्या मालकीची शेतजमीन खरेदीसाठी तेजस राऊत व कुंदन केंडे यांनी साळुंखे यांच्याशी चर्चा करून जमिनीचा मोबदला ठरवला.
या जमिनीच्या भोगवटा वर्ग दोनच्या परवानग्या साळुंखे या काढून देणार असल्याने आधी साठेखत करून नंतर खरेदीखत करण्याचे व जमीन 51 लाखांना विक्री करण्याचे ठरले. त्यानंतर तेजस राऊत यांनी जमिनीचे साठेखत करताना साळुंखे यांना दहा लाख रुपये दिले. साळुंखे यांनी त्यानंतर वेळोवेळी माझे वडील आजारी असल्याने आपण नंतर खरेदीखत करू असे सांगितले.
तेजस राऊत यांनी अचानक ऑनलाइन सातबारा तपासाला असता त्यामध्ये साळुंखे यांच्या नावावर असलेली ही जमीन गणेश सुरेश भोळे यांच्या नावावर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तेजस यांनी साळुंखे यांना भेटून विचारपूस केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने तेजस शिवाजी राऊत (वय 29, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा