पुणे : बेकायदेशीर जमाव एकत्र करून विनापरवाना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आजाद पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह ३०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी प्रसाद पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आजाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष भीमराव कांबळे, अध्यक्ष इब्राहिम शेख, लीगल सेल अध्यक्ष ॲड. तौसीफ शेख यांच्यासह इतर ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २३) आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. तरी देखील पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव एकत्र करून विनापरवानगी मोर्चा काढला. कलम १६८ प्रमाणे नोटीशीचे उल्लंघन केले. मोर्चामध्ये घोषणाबाजी करत दोन गटात शत्रुत वाढेल आणि सामाजिक एकोपा टिकण्यास बाधक होईल असे कृत्य केले. पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.