महावितरणच्या नवीन भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती

महावितरणच्या नवीन भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या भोसरी विभागातील भोसरी उपविभाग व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन भोसरी उपविभाग- 2ची निर्मिती केली आहे. त्यामुळे भोसरी आणि परिसरातील समाविष्ट गावांच्या वीज समस्येवर तोडगा निघणार आहे.
महावितरणकडून याबाबत मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. 17) परिपत्रक जारी केले.

नव्याने तयार झालेल्या भोसरी उपविभाग-2 चे कार्यालय व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांमध्ये एकूण 69 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी विभागात यापूर्वी आकुर्डी आणि भोसरी उपविभाग क्रमांक 1 असे उपविभाग होते. भोसरी व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांची निर्मिती करावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा सभागृहात राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार भोसरी उपविभाग – 2 ची नव्याने निर्मिती केली आहे.

कामकाजात येणार सुसूत्रता

भोसरी विभागाच्या नव्या रचनेत आता भोसरी उपविभाग-1 मध्ये भोसरी गाव, चर्होली, नाशिक रोड शाखा आणि नवनिर्मित भोसरी उपविभाग-2 मध्ये इंद्रायणीनगर (नवनिर्मित), मोशी, स्पाईनसिटी (नवनिर्मित) शाखा तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिंचवड, संभाजीनगर व चिखली (नवनिर्मित) शाखा असे प्रत्येकी तीन शाखा कार्यालय राहतील.

नव्या भोसरी उपविभाग-2 कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर लिपिक – 4 तर, उच्चस्तर लिपिकांची 2 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाई यांचे प्रत्येकी एक पद अशी 12 पदे मंजूर केली आहेत. चिखली, इंद्रायणीनगर व स्पाईनसिटी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक अशी प्रत्येकी 19 पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news