पुणे : अवैध धंद्यांवर कारवाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 मुलींची सुटका

पुणे : अवैध धंद्यांवर कारवाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 मुलींची सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हडपसर परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात वेश्याव्यवसाय तसेच मटका, जुगार अड्ड्याप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री पुणे-सोलापूर रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनीतील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून 3 मुलींची सुटका करण्यात आली. एक मुलगी महाराष्ट्रातील आहे, तर अन्य दोन परराज्यांतील आहेत. त्यांना रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. तसेच, एक जण फरार झाला आहे. सुजित आदित्य सिंह (वय 26) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, शेट्टी (अण्णा) नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हडपसर पोलिसांत पोलिस हवालदार अजय राणे यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अण्णा माने, प्रमोद मोहिते व पथकाने या माहितीची खातरजमा करून येथे छापेमारी केली.

त्यापूर्वी ( दि. 19) येथील परिसरात मटका, जुगार अड्ड्यावरही सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत 13 जणांना पकडण्यात आले. तर, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा 40 हजार 40 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चोरट्यांचा उच्छाद
शहरात लूटमार करणार्‍या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यातही हडपसर भागात या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पादचारी, तसेच वाहनचालकांना दुचाकीस्वार टोळक्याकडून धमकावत लुटले जात आहे. तर, महिलांचे मोबाईल व गळ्यातील सोन्याची दागिने हिसकावून नेले जात आहेत. सर्वाधिक गुन्हे असणार्‍या यादीत हडपसरचा प्रथम क्रमांक लागतो. 'स्ट्रीट क्राईम'चा आलेख गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news