पुणे : जादा भाडे आकारणार्‍या 192 खासगी ट्रॅव्हल्सना दणका

पुणे : जादा भाडे आकारणार्‍या 192 खासगी ट्रॅव्हल्सना दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवाच्या सव्वा भाडे आकारणार्‍या 192 खासगी ट्रॅव्हल्सवर पुणे आरटीओने धडक कारवाई केली आहे. या गाड्यांकडून 14 लाख 96 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिकला जळालेल्या बसच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी विविध नियमभंगांतर्गत पुणे आरटीओने अनेक खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. त्यानंतर दिवाळी सणानिमित्त प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स विरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत पुणे आरटीओच्या 4 वायुवेग पथकांमार्फत 338 खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत 192 बस दोषी आढळल्या. त्यामुळे या बसवर पुणे आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 14 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.

आरटीओचे 12 अधिकारी तैनात
करण्यात आले असून, जादा भाडे आकारणार्‍या खासगी बसचालकांवर ते लक्ष ठेवून आहेत. खासगी बसचालक जादा भाडे आकारणी करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
                                          – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

आरटीओच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारने मंजूर केलेल्या एसटीच्या दरापेक्षा दीडपट भाडे त्या त्या वर्गातील बससाठी आम्ही घेत आहोत. दिवाळीच्या सुटीत जिल्ह्यामध्ये गेलेल्या बस येताना रिकाम्या येतात. आमच्या गाड्यांना येताना प्रवासी नसतो. मात्र, तरीदेखील आम्ही प्रत्येक खासगी बसचालाकाला भेटून जादा भाडे न आकारण्याची सूचना केली आहे.
          – बाबा शिंदे, अध्यक्ष, खासगी वाहतूकदार, मालवाहतूक संघ, महाराष्ट्र राज्य

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news