

भोर; पुढारी वृत्तसेवा : रानात जनावरे चरत असताना बिबट्याने शेतकरी गणपत आबाजी रांजणे यांच्या गायीवर हल्ला केला. यामध्ये गाय मृत्युमुखी पडली, तर बिबट्याच्या तावडीतून बैल बचावला. ही घटना शनिवारी (दि. 17) आंबाडखिंड घाटात सकाळी दहाच्या सुमारास घडली. कोळेवडी, आंबाडे (ता. भोर) येथील शेतकरी गणपत आबाजी रांजणे यांच्या रानात जनावरे चरत असताना बिबट्याने हल्ला करीत गाभण असलेल्या दुभत्या गायीचा जागीच फडशा पाडला. बैलावरही बिबट्याने हल्ला केला. परंतु, बैलाने बिबट्याच्या तावडीतून सुटका करवून घेतली.
वाई, महाबळेश्वर, मांढरदेवला जाणारी वाहतूक आंबाडखिंड घाटातून होते. घाटाच्या परिसरात जंगल आहे. तसेच जवळच महाबळेश्वरच्या जंगलाचा भाग येत असल्याने पाणी व अन्नासाठी अनेक प्राणी या परिसरात येतात. वरवडी खुर्द, वरवडी बुद्रुक, वरवडी डायमुख, धनावडे वाडी, पाले, पळसोशी या परिसरातील अनेक पाळीव प्राणी या प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. या परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्या सापडला नाही.
या घटनेची माहिती आंबाडे कोळेवाडी येथील पोलिस पाटील संदीप रांजणे यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे वनपाल संदीप खट्टे, वनरक्षक विशाल अडागळे यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकर्याला लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. घटनास्थळी मनोज खोपडे, सुरेश रांजणे, संपत रांजणे, सुनील रांजणे, कालिदास रांजणे, प्रसन्न उल्हाळकर, बाळूदादा खोपडे, मोहन खोपडे यांनी भेट दिली.