

बावडा; पुढारी वृत्तसेवा : हवामानामुळे गावोगावी नागरिक खोकला, ताप व अंगदुखीने आजारी असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. दवाखाने व औषध दुकाने यामध्ये रुग्णांची गर्दी चांगलीच वाढली आहे. रात्रभर गारवा तर दिवसा ऊन या विषम हवामानामुळे संसर्गजन्य ताप, अंगदुखी, खोकला, अशक्तपणा आदी विकार नागरिकांमध्ये वाढले आहेत. साधारण 10-15 दिवसांपासून नागरिक या संसर्गजन्य आजाराने त्रस्त आहेत. औषधोपचार घेऊनही आठवडाभर खोकला बरा होत नसल्याचे चित्र आहे. तसेच तापही चार-पाच दिवस राहात आहे.
आता नव्याने ढगाळ हवामान तीन-चार दिवस राहणार असल्याने संसर्गजन्य रोगाची साथ कायम राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा खासगी दवाखान्यातून औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संसर्गजन्य आजारांमुळे कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजारी पडल्याने औषधोपचारासाठी नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.